मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मराठा आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य होणे ही बाब पटण्यासारखी नसल्यामुळे त्यांच्यावरील हे गुन्हे मागे घेण्याची मागणी पवारांनी केली आहे.
दरम्यान शरद पवार दोन दिवसापूर्वी कामोठे येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हे गंभीर गुन्हे मागे घेण्याची विनंती मराठा समाजाच्या वतीने त्यांना करण्यात आली. या विनंतीवरुन शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे.
कळंबोली आणि कामोठे येथील आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली होती. यादरम्यान पोलिसांची वाहनेही पेटवून देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर काही आंदोलकांवर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा यासह दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी पवारांनी केली आहे.
COMMENTS