दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र !

दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र !

मुंबई – दुष्काळी उपाययोजनांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरे पत्र लिहिले आहे.दुष्काळ दौर्‍यावर आलेले अनुभव आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत पवारांनी या पत्रात सरकारला सूचना केल्या आहेत. यापूर्वी 4 मे रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. चारा छावणीसाठी प्रति जनावर दिले जाणारे अनुदान कमी असून त्यात वाढ करण्याची पत्रात मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान टँकरने केला जाणारा अपुरा पाणीपुरवठा, टँकरच्या अनियमित फेर्‍या, अशुद्ध पाणीपुरवठा याबाबत पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. दौरा केलेल्या भागातील अनेक ठिकाणचे पाझर तलाव, मध्यम प्रकल्प दुरुस्त करण्याची मागणीही पवारांनी केली आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागात अद्याप रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याबाबत पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांना फळबागा वाचवण्यासाठी 2012-13 च्या दुष्काळात हेक्टरी 35 हजार रुपये अनुदान दिले होते, तसे अनुदान देण्याची मागणी पवारांनी केली आहे. तसेच शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याची तक्रार आणि पिक विमा भरूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे.

COMMENTS