शरद पवारांचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र, व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा !

शरद पवारांचं गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र, व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा !

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी पोलीस बंदोबस्तादरम्यान पोलिसांना तासंतास ताटकळत उभं राहायला लागत असल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.या मुद्द्यांवर लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवारांचं पत्र

राज्यात मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या दौऱ्याप्रसंगी गर्दी नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त नेमला जातो. जाहीर सभेच्या ठिकाणी मंत्री अथवा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्या आगमन आणि प्रस्थानवेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. मात्र, इतरवेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ कर्मचारीच नव्हे तर अशा सभांप्रसंगी पोलीस अधिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तिष्ठत उभे राहतात.

बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचारी-अधिकारी यांनी तत्पर आणि सज्ज असायला हवे. मात्र, सभा सुरळीत चालू असताना पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो. यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष त्रास होतो, असं मला वाटतं. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तिष्ठत उभं राहणे उचित वाटत नाही.

सभा शांततेत सुरु असताना महिला पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची किंवा इतर आसन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याविषयी आयोजकांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही तशी मुभा द्यावी,

मंत्री अथवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी रोड बंदोबस्तासाठी देखील पोलीस यंत्रणा तासनतास रस्त्याच्या दुतर्फा तिष्ठत उभी राहिलेली दिसून येते. नियोजित वेळेपेक्षा दौऱ्यास विलंब झाला असता पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण असहनीय होतो. रोड बंदोबस्त लावताना वायरलेस आणि इतर संदेश यंत्रणांद्वारे वेळेचे अचूक नियोजन व्हावे असं वाटते.

गृहमंत्री म्हणून या बाबींकडे वैयक्तिक लक्ष द्याल अशी अपेक्षा करतो असंही पवारांनी म्हटलं आहे.

COMMENTS