नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटे चर्चा झाली. या भेटीदरम्यान शरद पवारांनी राज्यातील ओल्या दुष्काळाची माहिती आणि अपेक्षित मदत याबाबत पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिकं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे केंद्राने तात्काळ मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र दिलं आहे. त्यात नाशिक आणि नागपूरमधील नुकसानीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान पुण्यात 30 तारखेला वसंतदादा पाटील शुगर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधानांना येण्याचं निमंत्रण पवारांनी दिलं आहे. 22 देशातील लोक इथे येणार आहेत. त्यामुळे याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी यावं असं पवार यांनी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे 30 तारखेला पंतप्रधान मोदी पुण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS