सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान उदयनराजे यांच्या उमेदवारीवरुन साता-यात वाद सुरु असून हे मतभेद मिटवण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचं दिसत आहे. यापुर्वी पवारांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं मनोमिलन घडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतरही शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका कायम ठेवली होती. त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांनी या दोन्ही राजेंना एकत्रित बोलवलं असल्यामुळे साता-यातील तिढा सोडवण्यात पवारांना यश येणार का हे पाहणं गरजेचं आहे.
तसेच सातारा आणि कोल्हापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असावा, याबाबत निर्णय झाला आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली होती. पण नक्की कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे, हे मात्र पवारांनी सांगितलं नाही. असं असलं तरीही राष्ट्रवादीकडून आता उदयनराजेंचं नाव निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS