मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. भीमा कोरेगावच्या मुद्द्यावर चर्चेसाठी पवारांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना बोलावले होते. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, तर काँग्रेसकडून ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव अमिताभ गुप्ताही उपस्थित होते.
या बैठकीनंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलत असताना गेले अनेक दिवसांपासून आम्ही अस्वस्थ आहोत, नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जाते, हे योग्य नाही. आम्ही आज या प्रकरणाचा आढावा घेतला. याची चौकशी NIA करते आहे, पण राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मत घेत आहोत. आम्हाला वाटतं हा तपास योग्य दिशेने सुरू नाही असं पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षणावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली नाही. याविषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही राज्य सरकारची इच्छा असल्याचं ते म्हणालेत.
तसेच अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या बिल्डिंगीच्या आरोपावरही पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसत हसत बोलत माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का? हा प्रश्न आहे असंही पवार म्हणाले आहेत.
COMMENTS