मुंबई – आपल्या आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी नियम मोडतोच. जाणूनबजून नाही मोडला तरी कधी कधी चुकूनही नियम मोडल्या जातो. राजकीय क्षेत्रातही अनेकवेळा राजकीय मंडळी कधीकधी नियम मोडतात. परंतु हा नियम मोडल्याची कबुली देण्याचं धाडस मात्र अनेक जणांमध्ये नसतं. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना कसा नियम मोडला याची कबुली स्वतः दिली आहे. झालं असं की शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सिंहासन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तेव्हा या चित्रपटासाठी मुख्यमंत्री कार्यालयात चित्रीकरण करण्यात येणार होतं. त्यासाठी अरुण साधू आणि जब्बार पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयात चित्रकरण करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. परंतु प्रशासकीय विभागाने त्यांना इथे चित्रीकरण करणं कसं अशक्य आहे हे सांगणारी नोटीस पाठवली होती. परंतु तरीही या चित्रपटाचं चित्रीकरण याठिकाणी करण्यात आलं. याबाबतची कबुली यावेळी स्वतः शरद पवार यांनी दिली असून नियमांना ओव्हररुल करण्याच्या सवयीमुळे मी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि सिंहासनसारखी अजरामर कलाकृती साकार झाली असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
सिंहासन चित्रपटाच चित्रीकरण सुरू झालं तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, अरुण साधू आणि जब्बार पटेल माझ्याकडे आले… चित्रपटाची शुटींग करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थानात चित्रिकरण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र प्रशासकीय विभागाने इथे चित्रीकरण करणं कसं अशक्य आहे हे सांगणारी नोटीस पाठवली.मात्र नियमांना ओव्हररुल करण्याच्या सवयीमुळे मी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि सिंहासनसारखी अजरामर कलाकृती साकार झाली.
दरम्यान अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित असलेल्या झिपऱ्या या चित्रपटाचा स्पेशल शो आज पुण्यातील चित्रपट संग्रहालयात आयोजित करण्यात आला होता. या शोसाठी माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यासह अरुण साधू यांच्या पत्नी अरुणा साधू, कुमार केतकर, जब्बार पटेल हे उपस्थित होते. त्यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी ही कबुली दिली आहे.
COMMENTS