मुंबई – ईडीच्या कार्यालयाला मी स्वत:च जाऊन भेट देणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. माझ्या आयुष्यातील हा दुसरा प्रसंग आहे. एकदा 1980 साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली होती तेव्हा जळगावमध्ये माझ्यावर खटला दाखल केला होता. आता ईडीने माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जी शोध घेणारी यंत्रणा आहे तिला पूर्ण सहकार्य करायचं अशी माझी भूमिका आहे. आता संपूर्ण एक महिना निवडणूक प्रचारासाठी वेळ देणार आहे.
त्यामुळे मी मुंबईबाहेर राहणार आहे. त्यामुळे ईडीला मला काही प्रेमाचा संदेश पाठवायचा असेल आणि मी उपलब्ध नाही असे व्हायला नको. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हा इतिहास आहे. मी संविधान मानणारा आहे. म्हणून 27 सप्टेंबरला मी दुपारी दोन वाजता मी ईडीच्या ऑफीसला जाणार आहे आणि त्यांना संपूर्ण माहिती देणार आहे. आणि त्यांचा काही पाहुणचार असेल तर तोही घेणार आहे असं पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथ खडसे होते त्यामुळे त्यांना सहाजिकच माहित असेल त्यात कुणाची नावं होती आणि कुणाची नावं नंतर घातली. माझ्यापुरता प्रश्न राहिला तर मी या संस्थेत कधीही संचालक नव्हतो. मात्र शिक्षण संस्था असो किंवा सहकारी संस्था कुठल्याही संस्थेचे प्रश्न माझ्याकडे आले की मी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करायचो असं पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS