तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी दिला किल्लारी भूकंपातील आठवणींना उजाळा !

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी दिला किल्लारी भूकंपातील आठवणींना उजाळा !

उमरगा – लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

येथील भूकंपाच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तत्कालिन मुख्यमंत्री पवार यांचा भूकंपग्रस्तांच्य वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित केला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील, आमदार राणाजगजितिसंह पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, शैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश बिराजदार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार पवार म्हणाले की, भूकंपाच्या भयावह संकटातून उभारी घेण्याचे सामर्थ्य तुमच्यात निर्माण झाले. ही एक आदर्श बाब असून तत्कालिन केंद्र शासनातील शिवराज पाटील चाकूरकर, उस्मानाबाद जिल्ह्यातून माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, लातूरमधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रातील अर्थमंत्री मनमोहनसिंग तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयतातून आदर्श पुनर्वसन होऊ शकले. मी माझ्या आजारावरील उपचारासाठी ब्रीचकँडीत दाखल झालो तेव्हा एका शिकावू डॉक्टराने मला तुमचे सहा महिन्याचे आयुष्य असल्याचे सांगितले. त्यावेळी मी त्याला म्हणालो, तु २८ वर्षाचा आहेस. तुझ्या वयाच्या दुप्पट मला आयुष्य मिळणार आहे. कारण मी भूकंपग्रस्तांना मदत केलीय. त्यांना जगण्याचा आधार दिलाय. त्यांच्या आशिर्वादातून मला एक वेगळीच उर्जा मिळालीय. त्यामुळे मला आणखी आयुष्य मिळणार असल्याचेही पवार यांनी त्यावेळी डॉक्टरला बोलून दाखविले.

भूकंपात अनाथ झालेल्या दोन हजार लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी पुण्यात शिक्षणाची सोय केली. यातून ती पिढीही आता पुढे आली आहे. याचा अभिमान असल्याचे पवार म्हणाले. सध्या शेतकरी आत्महत्या होत आहेत, परंतु, भूकंपानंतर एकाही शेतकऱ्याने आत्मह्त्या केली नाही. मोठ्या धैर्याने त्यांनी उभारी घेतल्याचे पवार म्हणाले. पवारांचे यांचे भूकंपग्रस्तांसाठी काम मोठे असल्याचे सांगत माजी केंद्रीयमंत्री चाकूरकर यांनी पवारांचे कौतुक केले. भूकंपग्रस्त कृतज्ञता सोहळा समितीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रास्ताविक केले.

COMMENTS