मुंबई – शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. परंतु अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सत्तास्थापना सध्याच शक्य नाही त्याला वेळ लागेल असं पवारांनी नागपुरात म्हटलं असल्याची माहिती आहे. पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली चर्चा लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा शिवसेनेलाही धक्का असणारअसल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून, आजचा दुसरा दिवस आहे. अतिवृष्टीमुळं शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. शेतकऱ्यांच्या पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी जास्त आहे, याकडे पवारांनी लक्ष वेधलं.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असून, केंद्राकडून शेतकऱ्यांना भांडवल उभारणीसाठी मदत व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यात पुन्हा भाजपचंच सरकार येईल असे त्यांचे नेते म्हणत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल, असं त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं. त्यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन इतकंच माझ्या डोक्यात आहे,’ अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
COMMENTS