मुंबई – देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे बर्याच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे यासह अन्य विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.
यावेळी प्रामुख्याने खालील गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
कोरोनानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्रशासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.
स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्रसरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा अशी मागणीही शरद पवार यांनी केली.
ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्रसरकारने घ्यावी अशी विनंतीही शरद पवार यांनी केली.
कोरोनाचे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही असेही शरद पवार म्हणाले.
समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन शरद पवार यांनी केले.
दरम्यान यावेळी शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांगला संवाद आयोजित केला. त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले शिवाय ही जागतिक समस्या असल्याने सर्व राजकीय पक्ष आपले उचित सहकार्य देतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS