पुणे – महापालिकेतर्फे तळजाई टेकडीवर तयार करण्यात आलेल्या क्रिकेटपटु सदु शिंदे क्रिकेट स्टेडीयमचं उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी पवारांनी हातात चेंडू घेत चव्हाणांना बॉलींग ( गोलंदाजी) केली. पवारांचा चेंडू आपल्या बॅटवर येतोय अशी आशा चव्हाण बाळगून होते. मात्र त्यांनी दोन्ही चेंडूंवर चकवा खाल्ला. अर्थात, पवारांना चव्हाणांची दांडी उडवता आली नाही हे खरय. मात्र त्यांनी टाकलेले चेंडू टोलवणं देखील चव्हाणांना शक्य झालं नाही हेही लक्षात घ्यायला लागेल. पवारांनी दोन चेंडू टाकून झाल्यानंतर चव्हाणांनी गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला. मात्र तोवर पवार विकेट सोडून निघून गेले होते. आता पवारांच्या या अशा खेळण्याचा काय अर्थ निघतो याची चर्चा लगेचच सुरु झाली.
दरम्यान या क्रिकेट स्टेडीयमच्या माध्यमातून सदुभाऊ शिंदे यांच स्मरण आपण ठेवलं, मात्र त्यांच्याबरोबरीनं रंगा स्वामी, नाना जोशी, चंदु बोर्डे यांनी क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला. हे ध्यानात ठेवावं लागेल. पुण्यात चांगले खेळाडू देण्याची क्षमता आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे चांगले क्रिकेटपटू घडवण्यासाठी चांगले प्रशिक्षक नियुक्त करण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.
मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना द्रविडनं कर्णधारपदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. मी सचिनला कर्णधार हो म्हणालो. त्यानंही नकार दिला. कुणाला कर्णधार करायचं हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सचिन आणि द्रविड दोघांनी धोनीचं नाव सुचवलं. आम्ही विकेट कीपरला कर्णधार केलं पुढे त्यानं भारताचं नाव उज्वल केलं असल्याचंही यावेळी पवार म्हणाले.
COMMENTS