मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 20 ऑगस्टला ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात ते मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत. पवार यांनी अनेकदा राज्याचं मुख्यमंत्रिपद आणि देशाचं कृषीमंत्रिपद भूषवलं असल्यामुळे त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांचं पुनर्वसन करताना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याबाबत ते निवेदनातून माहिती देणार असून आहेत. या भेटीदरम्यान शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांना मागील आठवड्यात पुराचा मोठा फटका बसला आहे. या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली आहे, परंतु त्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने प्रत्येक कुटुंबाला 5000 देण्यास सुरुवात केली आहे. तसेच ज्यांची घरे पडली आहेत त्यांना राज्य आणि केंद्र सरकारमार्फत साडेतीन लाख रुपये देण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावरील गावांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावे पुराने वेढली असून, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. शेतीचे मोठे नुकसान झाल्याने पूरग्रस्त हवालदिल आहेत. या पूरस्थितीचे तातडीने पंचनामे करुन पूरग्रस्तांना विनाअट १०० टक्के मतद देण्याची मागणी यापूर्वी पवारांनी सरकारकडे केली होती.
COMMENTS