नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. दुपारी 12:40 वाजता ते मोदींची भेट घेणार असून या भेटीदरम्यान ते राज्यातील शेतकय्रांसंदर्भात बातचीत करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भेटीत याच मुद्द्यावर जास्त भर असेल असे सांगण्यात येत आहे. केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत अपेक्षित आहे. तसेच यावेळी पवार यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं होतं. राज्यसभेत भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्या पक्षासह सर्वांनी शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच मोदी हे कायमच पवार हे माझे गुरु असल्याचे म्हणत आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आज होणाऱ्या बैठकीकडे अनेक अर्थाने पाहिले जात आहे.
दरम्यान राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडीचं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. परंतु सत्तास्थापनेचा सस्पेन्स अजून कायम आहे. काँग्रेसनं अजून कोणतीही भूमिका घेतली नसल्यामुळे हा तिढा अजून सुटलेला नाही. अशातच पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं रोतं. त्यानंतर आता शरद पवार त्यांची आज भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीत काय चर्चा होणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS