निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन !

निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ शरद पवारांचं अन्नत्याग आंदोलन !

मुंबई – केंद्र सरकारनं बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळं निलंबित करण्यात आलेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी निलंबित खासदारांना पाठिंबा दर्शवला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांना राज्यसभेत जोरदार विरोध झाला होता. विधेयकाला विरोध करत सदस्यांनी चर्चेची मागणी केली होती. त्यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी आठ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यामुळं काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदारांचे निलंबन मागे न घेतल्यास उर्वरित कामकाजावर बहिष्कार घालण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. तसेच मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनीही निलंबित खासदारांना पाठिंबा दर्शवला. तसंच, आपण स्वत:ही आज दिवसभर उपोषण करणार असल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं.

COMMENTS