2014 पेक्षा 2019 मध्ये भाजप जास्तीच्या जागा जिंकेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य म्हणज्ये निव्वळ त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रय़त्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्याच्यापेक्षा त्या वक्तव्याला फारसं महत्व नाही असंही पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या झालेल्या 10 पोटनिवडणुकीत 7 ते 8 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात समजू शकतो. पण उत्तर प्रदेशातील आणि तोही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात झालेला पराभव भाजपसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होतील असंही पवार म्हणाले. द क्विंट या हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी ही मते मांडली आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत बसपा आली तर त्याचा मोठा फायदा आघाडीला होईल. सर्वात अधिक फटका भाजपले बसेल असं भाकित शरद पवार यांनी केलं आहे. विदर्भामध्ये बसपाला चांगला जनाधार आहे. विदर्भातील दलित मतदार हा बसपाला मानणार आहे. गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसपाचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. त्यामुळे हे तीन पक्ष एकत्र आले तर त्याचा मोठा फायदा आघाडीला होईल असंही पवार म्हणाले. त्यामुळेच देशाचं राजकारण बदलण्याची ताकद महाष्ट्रातही निर्माण होईल असंही पवार म्हणाले. बसपाला सोबत घेण्यासाठी आधी काँग्रेससोबत चर्चा करु आणि त्यानंतर बसपाशी बोलू असंही पवार यांनी सांगितलं.
शिवसेना सत्तेत असूनही विरोधी पक्षासारखी वागत आहे. पण आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत जाईल का ? या प्रश्नावर पवार यांनी नकारार्थी उत्तर दिलं. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला नाही तर नितीशकुमार यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तसंच सध्या सरकार सुरू आहे. त्यामुळे उगीच विरोधात कशाला जायचे असा विचार शिवसेनेने केला असावा. पण आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत जाणार नाही असा माझा अंदाज आहे असंही पवार यांनी सांगितलं. एकटी लढली तर शिवसेनेचा फायदा होईल असा दावाही पवार यांनी केला. मंबईत शिवसेनेची ताकद आहे. त्यांनी जर युती केली तर मोठ्या प्रमाणात जागा भाजपला द्याव्या लागतील. मात्र स्वबळावर लढली तर पूर्ण मुंबईमध्ये त्यांना उमेदवार उभे करता येतील आणि त्याचा फायदा त्यांना होईल असंही पवार म्हणाले. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेची स्थिती काही प्रमाणात का होईला सुधारेल असंही पवार म्हणाले.
राज्यातील मराठा समाजाची स्थिती चांगली नाही. पुण्याच्या गोखले इन्स्टीट्यूटने दिलेल्या अहवालानुसार राज्यात सर्वात अधिक आत्महत्या करणारे शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. आर्थिक स्थिती त्यांची चांगली नाही. त्यामुळेच आरक्षणाची मागणी पुढे आली आहे. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असंही पवार म्हणाले. मात्र त्यांनीही कोणताही कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करायला हवे असंही पवार म्हणाले. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधात असताना आमच सरकार आल्यावर 100 दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं होतं. मात्र ते पाळण्यात आलं नाही. त्यामुळे मराठा समाजात रोष आहे असंही पवार म्हणाले.
COMMENTS