नवी दिल्ली – दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. शीला दीक्षित यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबच्या कपूरथलामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तर प्रदेशातील कन्नौजच्या खासदार म्हणूनही काम पाहिलं. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिल्लीचा विकास केला. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगात ५ वर्ष भारताचं प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचं लक्ष वेधलं होतं. सध्या दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे होती. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
COMMENTS