मुख्यमंत्रीसाहेब अकरावी प्रवेशाचा घोळ मिटवा – शेलार

मुख्यमंत्रीसाहेब अकरावी प्रवेशाचा घोळ मिटवा – शेलार

मुंबई – करोनामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्याप १ लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून हा घोळ मिटवा, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘ इयत्ता दहावी निकाल जूनमध्ये जाहीर झाले. त्यानंतर आजपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यावर्षी निकाल लागल्यानंतर १५ दिवस विलंबाने ही प्रक्रिया सुरू केली गेली. दरवर्षीप्रमाणे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीच ही प्रक्रिया सुरू केली असती, तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनासुध्दा आरक्षणानुसार प्रवेश मिळून आरक्षणावर स्थगिती येईपर्यंत आपली प्रक्रिया पूर्ण झाली असती. या शासन दिरंगाईचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसला. यावर्षी मुळातच उशिराने सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया पुढील काळातही वेग पकडू शकली नाही. आजपर्यंत ही प्रक्रिया वेगाने दोषमुक्त सुरू आहे, असे चित्र सध्या राज्यात दिसत नाही. अद्याप सुमारे १ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत वेळीच शासनाने लक्ष देण्याची गरज आहे’, अशी मागणी केली आहे.

 

COMMENTS