मुंबई – मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याच्या निर्णयाला केंद्राने आक्षेप घेतल्यानंतर आता भाजपनं राज्य सरकारला घेरण्याची संधी साधली असल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी थेट आव्हान दिलं आहे. कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण उध्दव ठाकरे आज काँग्रेससोबत करताय की काय? असा सवाल शेलार यांनी केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींना जाहीर आव्हान करतो की आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या, आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गोरेगाव येथील आरे कॉलनीत कारशेड उभारण्यास विरोध झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं ही कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्राच्या उद्योग व व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) त्यास आक्षेप घेत कारशेडचं काम थांबवण्याच्या सूचना राज्याला केल्या आहेत. तसं पत्रच सरकारला पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं हा प्रकल्प आणखी रखडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाला होत असलेल्या विलंबासाठी सर्वस्वी राज्य सरकार दोषी असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे. तसेच यामध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे.
इतर बातम्या
COMMENTS