मुंबई – विविध मागण्यासाठी शिक्षक भारतीचा विराट मोर्चा आज मुंबईत पार पडला. यावेळी समान काम, समान वेतन, समान पेन्शन सर्वांसाठी ही घोषणा घुमली. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्टेशन ते परळच्या कामगार मैदानापर्यंत राज्यभरातून आलेल्या शिक्षक, अंगणवाडी ताई, मानसेवी शिक्षक, अंशकालीन निर्देशक यांचा मोर्च्यात सहभाग होता. शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात आणि समतेच्या मागणीसाठी हा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला होता.
दादर रेल्वे स्टेशनपासून सकाळी ११ वा. मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये अनेक घोषणा घुमल्या.
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा
शाळांचे कंपनीकरण बंद करा
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शिक्षकांच्या मागणीनुसार करा
अंगणवाडी ताईंना पूर्व प्राथमिक शिक्षकांचा दर्जा द्या
डी.एड.बी.एड.भरती सुरु करा. शिक्षक, प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरा
रात्रशाळा, रात्र ज्युनि. कॉलेज पूर्ववत करा
केंद्राप्रमाणे सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करा
आवाज कुणाचा, शिक्षक भारतीचा
कपिल पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है!
मोर्च्याच्या अग्रभागी आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, अंगणवाडी ताईंच्या नेत्या सुनंदा पवार, घाटगे मॅडम, डाटाएंट्री ऑपरेटर संघटनेचे दिपक पसरटे, मानसेवी शिक्षकांचे नेते सय्यद ख्वाजा, ३८ प्राथमिक शिक्षक संघटनांचे समन्वयक किशोर पाटील हे होते. मोर्च्यात महिला शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती.
परळच्या कामगार मैदानात मोर्च्याचे रुपांतर भव्य सभेत झाले. सभेला संबोधित करताना आमदार कपिल पाटील म्हणाले, ‘समान काम, समान वेतन, समान पेन्शन, सन्मान याची हमी संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे. पण या सरकारला हे मंजूर नाही. या मागण्यांसाठी भांडावं लागतं, ही शोकांतिका आहे. या लबाड सरकारने गेली साडे चार वर्षे शिक्षण क्षेत्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे.
समतेची मागणी धुडकावून लावली आहे. न्यायासाठी आरडाओरडा करणाऱ्यांना हे सरकार देशद्रोही ठरवतं. जनजागृती करणाऱ्यांना देशविरोधी घोषित करतं. शाळा बंद करणं, अभ्यासक्रम बदलवणं हा या सरकारचा अजेंडा आहे. मटण, मासे खाणाऱ्यांना मारण्याचे प्रकार या सरकारच्या राजवटीत घडले. नथुराम गोडसेचं उदात्तीकरण वाढलं. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना देशद्रोही ठरवण्याची हिमंत सनातन्यांची झाली. देशात असं कधी घडलं नव्हतं. याला शिक्षक बिरादरीच उत्तर देऊ शकते.
त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांना छळणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुढच्या विधानसभेचा रस्ता कठीण आहे. या सरकारचे अच्छे दिन जानेवाले है, अपने दिन आनेवाले है.’ सभेचे सूत्रसंचलन शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे आणि कार्यवाह प्रकाश शेळके यांनी केले.
COMMENTS