शिरुर लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतली जनमत चाचणी, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

शिरुर लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतली जनमत चाचणी, ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब !

पिंपरी चिंचवड – आगामी लोकसभा निवडणुकसाठी राष्ट्रवादीकडून शिरुर मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हे यांना याठिकाणी उमेदावरी दिली जाऊ शकते याबाबत अंदाज वर्तवला जात होता. परंतु या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मंचर येथील सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट जनमत चाचणी घेतली. यावेळी इच्छुक उमेदवारांची नावं अजित पवारांनी सभेत पुकारली.

पहिल्यांदा त्यांनी माजी आमदार विलास लांडेंचं नाव पुकारलं मात्र त्यांच्या नावाला प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभा लढलेल्या देवदत्त निकम यांच्या नावाला थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र जेव्हा डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव अजित पवार यांनी घेतलं तेव्हा मात्र टाळ्या आणि शिट्ट्यांसह भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तुमच्या मनातील उमेदवारालाच राष्ट्रवादीचं तिकीट दिलं जाईल, असं सांगून अजित पवार यांनी एकप्रकारे अमोल कोल्हे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

दरम्यान कोल्हेंच्या पक्षप्रवेशानंतर शिरुर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून संवाद यात्रा सुरु आहे. गुरुवारी मंचरमध्ये पार पडलेल्या या जाहीर संवाद यात्रेत अजित पवारांनी इच्छुक उमेदवारांसाठी थेट मतदानच घेतलं, यासाठी उपस्थितांना हात वर करण्याचं आवाहन केलं गेलं.विलास लांडे, देवदत्त निकम, पोपटराव गावडे आणि अमोल कोल्हे अशा चौघा जणांच्या नावाबाबत विचारणा झाली.

त्यावेळी लांडे, निकम आणि गावडे यांना अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र अमोल कोल्हे यांचं नाव घेताच सभागृहात एकच जल्लोष झाला होता. त्यामुळेशिवसेनेचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याविरोधात अमोल कोल्हेंनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS