विधानसभेची वाट अवघड असल्यानेच विलास लांडेंचा लोकसभेसाठी प्रयत्न ?

विधानसभेची वाट अवघड असल्यानेच विलास लांडेंचा लोकसभेसाठी प्रयत्न ?

पुणे – लोकसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे. तिथून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विद्यमान खासदार आहेत. सध्या भाजप शिवसेना युतीचा प्रश्न अधांतरीच आहे. तिरंगी लढत झाल्यास पक्षाला विजय मिळू शकतो अशी राष्ट्रवादीला आशा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप वळसे पाटील यांना लढण्यासाठी आग्रह धरला जात आहे. मात्र ते लढायला तयार नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे देवदत्त निकम, विलास लांडे, मंगलदास बांदल यांची नावे चर्चेत आहे. विलास लांडे यांचं नाव चर्चेत आल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2009 मध्ये विलास लांडे लोकसभा निवडणूक लढले होते. त्यावेळी आढळरावांकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी आपल्याला बळीचा बकरा बनवल्याची भावना त्यांची होती. असं असताना आता लांडे पुन्हा लोकसभा निवडणूक का लढवू इच्छित आहेत. यावरुन विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघातून विलास लांडे यांचा दारुण पराभव झाला होता. त्यांचेच भाच्चे जावई महेश लांडगे यांनी अपक्ष लढून लांडेंना आस्मान दाखवले होते. लांडगेंची नवी कोरी पाटी आणि आक्रमकपणा भोसरीकरांना चांगलाच भावला होता. आमदार झाल्यानंतरही लांडगेंनी तीच तडफ दाखवत आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यामुळे आजची त्यांच्याबाबत मतदारसंघात चांगले मत आहे. भले भाजपविषयी नाराजी असली तर लांगडेंना मतदारसंघात चांगली पसंती आहे. त्यामुळे महेश लांडगे यांचे विधानसभेसाठी पारडे जड असल्याची चर्चा आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणज्ये युती झाली नाही तरी भोसरी मतदारसंघात शिवसेनेची फारशी ताकद नाही. त्यामुळे युतीच्या मतांमध्ये फारशी फूट पडणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे भोसरीतून आपला यावेळीही निभाव लागणार नाही अशी भिती विलास लांडे यांना आहे. त्यामुळेच त्यांनी आता शिरुर लोकसभेसाठी दावेदारी करायला सुरुवात केली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिरुरमध्ये युती नाही झाली तर भाजप शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल अशी त्यांना आशा आहे.

तसंही शिरुरमध्ये राष्ट्रवादीकडे लढण्यासाठी फारसं कुणी इच्छुक नाही. त्यामुळे आपण लढलो आणि पराभव झाला तरी पक्षाकडे आपला क्लेम राहील आणि विधान परिषद तरी पदरात पाडून घेता येईल असा लांडेचं गणि असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नेमकं काय होतं ते पाहण्यासाठी आपल्याला तीन महिने वाट पहावी लागेल.

COMMENTS