‘भाज्यपाल’ असा उल्लेख करून सेनेने सोडला बाण

‘भाज्यपाल’ असा उल्लेख करून सेनेने सोडला बाण

मुंबई – पुद्दुचेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळले आहे. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिक करण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यावरुनच शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये भाजपसह राज्यपालांवर बाण सोडले. ‘किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे. ‘ असा टोला शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.

‘प. बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू–कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही. ‘पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा, तो सगळय़ांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे!’ असे म्हणत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.

पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असे काही भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केले. मध्य प्रदेशातील सरकार पाडले तेव्हाही ‘‘पुढचा घाव महाराष्ट्रावर’’ असे जाहीरच केले होते. त्यानंतर ‘‘बिहारचे निकाल एकदाचे लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसे परिवर्तन घडवून दाखवतो’’ वगैरे बतावण्या करून झाल्या. आता बात पुद्दुचेरीची सुरू आहे, पण जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’ असे चित्र आहे. पुन्हा मध्य प्रदेश, पुद्दुचेरीत काँग्रेस होती. महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यामुळे कोणी नसती उठाठेव करण्याच्या भानगडीत पडू नये. पुद्दुचेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी व लटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रातही करून झाले.

पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी यांच्या सरकारला धड काम करू दिले नाही. हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे.

COMMENTS