शिवसेना देणार पाच ते दहा आमदारांना डच्चू?

शिवसेना देणार पाच ते दहा आमदारांना डच्चू?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपल्या पाच ते दहा विद्यमान आमदारांना डच्चू देणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेत सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. तसंच युतीचं चित्र अस्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेकडून 288 जागांची चाचपणी सुरु आहे. अशातच 63 आमदारांपैकी साधारणत: 5 ते 10 आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत संधी न देण्याचं पक्षश्रष्ठिंनी ठरवलं असल्याची माहिती आहे. जे आमदार गेल्या पाच वर्षात ‘मातोश्रीवर आले नाहीत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत कमी पडले आहेत, ज्यांच्याविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत, जनतेची कामं केली नाहीत, अशा पाच ते दहा आमदारांना डच्चू देण्याचा विचार केला जात असल्याची माहिती आहे. 5 ते 10 आमदारांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या जागेवर नवीन उमेदवारांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे कोणते आमदार असणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभेतील युतीवर अनेक वेळा चर्चा झाली. पण त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. त्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अशातच आता शिवसेनेनं 135 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. तर 9 जागा या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचं त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव भाजपला मान्य असणार की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS