मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता उमेदवारीवरुन शिवसैनिक आणि नवीन आलेल्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर नवीन नेत्यांना उमेदवारी दिल्यास निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अशातच सोलापूरमध्येही शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. साेलापूरमध्ये विधानसभा मतदारसंघातून नव्यानेच शिवसेनेत आलेल्या दिलीप मानेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी विराेध केला आहे. जुन्या आणि निष्ठावंत शिवसैनिकालाच उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना सोलापूरमध्ये विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी यासाठी शिवसेनेचे नगरसेवक आणि काही पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते देखील याच मतदारसंघातून इच्छुक आहेत. मात्र बाहेरून आलेल्या नेत्यांपेक्षा निष्ठावंतांना संधी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय.निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS