कोल्हापूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपनं युती केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काही मतदारसंघात शिवसेना-भाजप निवडणूक लढवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. परंतु या जागा बदलण्यात येणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु होती. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कुठलेही हेवेदावे न ठेवता सर्वांनी कामाला लागा आणि कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आणा, त्यासाठी पक्ष म्हणून जी मदत लागेल ती उभी करू अशी ग्वाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली.
दरम्यान मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा कडवा विरोध आहे, त्यामुळे त्यांची जागा शिवसेनेने घ्यावी व कोल्हापूरची जागा भाजपाला द्यावी, असे प्रयत्न मुख्यत: जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पातळीवर सुरू होते. आपल्या जिल्ह्यातील लोकसभेची एक तरी जागा आपल्या पक्षाकडे असावी असा त्यांचा प्रयत्न होता. भाजपाकडे ही जागा घेऊन तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना उभे करायच्या हालचाली भाजपाकडून सुरू होत्या.
परंतु आमच्या जागा बदलणारी ही मंडळी कोण अशीही विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
COMMENTS