शिवसेनेच्या ‘त्या’ इशा-यामुळे भाजपच्या अडचणीत भर !

शिवसेनेच्या ‘त्या’ इशा-यामुळे भाजपच्या अडचणीत भर !

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवसेंदिवस भाजपच्या अडचणीत भरत पडत असल्याचं दिसत आहे. भाजपमधील काही नेते आणि आता  शिवसेनेनं राम मंदिरावरुन भाजपला इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अडचणीत भर पडली असल्याचं दिसत आहे. राममंदिर बांधा, नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेने सामना संपादकीयमधून दिला आहे.

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. राष्ट्रपतींपासून उत्तर प्रदेशच्या राज्यपालापर्यंत, पंतप्रधानांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत अडचण कसली आहे? बाबरीवर हातोडा शिवसैनिकांनी मारला. बाबरी उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली. आता तुमचे राज्य आले तर राममंदिर तरी उभारा. नाहीतर हिंदू समाज खोटारडय़ांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही. असं शिवसेनेनं सामनातून म्हटलं आहे.

दरम्यान राम मंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणास बसलेल्या महंत परमहंस दास यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलं. अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राम मंदिराच्या उभारणीबाबत एक शब्दही काढत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

2019 च्या आधी राम मंदिराची उभारणी झाली नाही तर भाजपाला रामराम करण्याचा इशारा भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिला आहे. त्यानंतर शिवसेनेनंही हा इशारा दिला असल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिरावरुन भाजप चांगलीच अडचणीत सापडली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS