नागपूर – हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शेतकय्रांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. त्याचीच आठवण भाजपने करुन देताना, ‘सामना’च्या बातमीचं कात्रण पोस्टररुपात झळकावून, भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यादरम्यान सभागृहात शिवसेना, भाजपमधील दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली असल्याची माहिती आहे.
दरम्यान बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यात मारामारी झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.
दरम्यान या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही पक्षातील आमदारांना हे वर्तन ठिक नसल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षातील आमदारांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. परंतु असं एकमेकांच्या आंगावर जाण योग्य नाही. तसेच अशाप्रकारचं वर्तन दुसय्रांदा होऊ नये अन्यथा त्या आमदारांवर कारवाई केली जाईल असंही पटोले म्हणाले आहेत.
COMMENTS