मुंबई – शिवसेना-भाजपमधील 4 आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज मंजूर केले आहेत. यामध्ये भाजपचे आमदार अनिल गोटे तर शिवसेनेच्या आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार सुरेश धानोरकर आणि आमदार हर्षवर्धन जाधव या चार आमदारांचे राजीनामे आज मंजूर करण्यात आले आहेत. या चारही आमदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी आपले आमदारकीचे राजीनामे दिले होते. त्यानंतर आज बागडे यांनी या चारही आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत.
अनिल गोटे
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गोटे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली आहे. अनिल गोटे यांनी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून उभे आहेत.
हर्षवर्धन जाधव
तसेच औरंगाबाद- कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
प्रताप पाटील-चिखलीकर
तसेच नांदेडमधील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिल्याने आमदारकीचा राजीनामा दिला होता. सन २०१४ मध्ये लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून प्रताप पाटील-चिखलीकर हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर चिखलीकर यांनी भाजपमधून नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.
सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. भाजपा-शिवसेना युतीमुळे नाराज असलेल्या धानोरकरांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर चंद्रपूरमधून विनायक बांगडे यांच्याऐवजी धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.
COMMENTS