मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये काही नेते उद्या प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु हे पक्षप्रवेश पुढील चार ते पाच दिवस लांबणीवर गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे जीव गेले आहेत. तर अनेक कुटुंब बेघर झाले आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांचे सर्व राजकीय कार्यक्रम थांबवून शिवसेना-भाजप सरकारने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पावले उचलली आहेत.
दरम्यान काल माण खटाव तालुक्याचे नेते शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे. एकिकडे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष मदतकार्यावर भर देण्याऐवजी अजूनही पक्षांतर आणि पक्षप्रवेशातच गुंतलेले आहेत. त्यामुळे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना आणि जीव जात असताना सरकार गंभीर आहे का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
तसेच भाजप नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाची बैठक घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हवाई दौरे खूप झाले त्यांनी आता जमिनीवर यायला हवे. स्वतः एनडीआरएफच्या कार्यालयात जाऊन प्रशासनाला गांभीर्य द्यायला हवे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
त्याचबरोबर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा आज पूर पाहणीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व बाजूंंचा विचार करुन शिवसेना, भाजपनं पुढील चार ते पाच दिवसांचे राजकीय कार्यक्रम थांबवले असल्याची माहिती आहे.
COMMENTS