युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची भाजपकडे आणखी एक मोठी मागणी !

युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेची भाजपकडे आणखी एक मोठी मागणी !

पुणे – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपनं युती केली आहे. या युतीसाठी शिवसेनेनं भाजपपुढे अनेक अटी ठेवल्या आहेत. त्यानंतर आता शिवसेनेनं भाजपकडे आणखी एक मागणी केली आहे. पुणे महापालिकेतील सत्तेतही वाटा देण्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केली आहे. आठवलेंच्या रिपाइं गटासोबत भाजप पुणे महापालिकेत एकहाती सत्तेत आहे. शिवसेनेचे पुणे महापालिकेतील गटनेते संजय भोसले यांनी याबाबत भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांना पत्र दिले असून त्यामध्ये त्यांनी महापालिकेतील सत्तेतही शिवसेनेला वाटा देण्याची मागणी केली आहे.
पुणे महापालिकेतील निवडणुकीत 162 जागांपैकी भाजपला 98 जागा, तर शिवसेनेला केवळ 10 जिंकता आल्या होत्या. रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष भाजपसोबत होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुणे महापालिकेत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना विरोधात राहिली. परंतु आता लोकसभा आणि विधानसभेसाठी युती झाल्यामुळे पुणे महापालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी उपमहापौरपद देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तसेच एक वर्षासाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद, चार विषय समित्यांपैकी प्रत्येक वर्षी दोन समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद, एका प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला भाजप आता काय उत्तर देणार ते पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS