भंडारा – शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून जिल्हाप्रमुखानं भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेनेला जोरदार धक्का बसला आहे.
दरम्यान राजेंद्र पटेल यांच्या प्रवेशामुळे भाजपला तुमसर विधानसभा मतदारसंघात मोठा फायदा होणार आहे. शिवाय या लोकसभा पोटनिवडणुकीतही ते भाजपला मदत करणार आहेत. तसेच भाजपला भंडाऱ्यात पुन्हा पोवार समाजाचा नेता मिळाल्यामुळे आगामी निवडणुकीत याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे.
दरम्यान शिवसेनेत येण्यापूर्वी ते भाजपमध्येच होते. मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या चरण वाघमारे यांनी पटले यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेनेत ते भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष होते.
COMMENTS