मुंबई – निवडणूक आयोगाने बंधनकारक केल्यामुळे सर्वच पक्षांना आता पक्षांतर्गत निवडणुका घेणं अनिवार्य झालंय. त्यानुसार आता शिवसेनेतही पक्षांतर्गत निवडणुका होणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात या निवडणुका घेतल्या जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना नेते, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य आणि शिवसेना उपनेते या पदासाठी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी बाळकृष्ण जोशी यांना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आलंय.
दरम्यान शिवसेना नेतेपदासाठी पक्षात जोरदार लॉबिंग सुरू आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड होणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. सध्याचे राज्यातले कॅबिनेटमत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव अग्रकमाने घेतलं जात आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री अनंत गिते, लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषद शिवसेना मुख्य प्रतोद डॉ.नीलम गोऱ्हे, विधान परिषद शिवसेना गटनेते ऍड अनिल परब यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता लागली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
5 जानेवारी ते 10 जानेवारी 2018 या कालावधीत नामांकन पत्र दिली आणि स्वीकारली जातील.
11 जानेवारी 2018 ला नामांकन पत्रांची छाननी
13 जानेवारी 2018 ला दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन पत्र मागे घेता येणार
23 जानेवारी आवश्यकता भासल्यास सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान
त्यानंतर 3 वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.
COMMENTS