भाजपनंतर आता शिवसेनेकडून ‘या’ पाच बंडखोरांची हकालपट्टी!

भाजपनंतर आता शिवसेनेकडून ‘या’ पाच बंडखोरांची हकालपट्टी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करणाय्रा भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. काल भाजपकडून चार बंडखोरांची हकालपट्टी करण्यात आली होती. तुमसर येथील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधील  बाळासाहेब ओव्हाळ, तर अहमदपूरमधील दिलीप देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेनेही पाच बंडखोरांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही कारवाईची सूत्रं हलली आहेत. उस्मानाबाद आणि सोलापुरातील प्रत्येकी दोन, तर माढ्यातील एका बंडखोराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
उस्मानाबादमधील अजित पिंगळे आणि सुरेश कांबळे, माढा मतदारसंघातील महेश चिवटे, तर सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि महेश कोठे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील बंडखोर आमदार तृप्ती सावंत, वर्सोव्यातील बंडखोर नगरसेविका राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिममध्ये बंडखोरी करणाऱ्या सुरेश भालेराव यांच्यावर पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे बंडखोरांबाबत शिवसेना दुजाभाव केला असल्याची चर्चा आहे.

COMMENTS