बंगळुरू – गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षातील एप्रिल-मे मध्ये कर्नाटकची विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस आणि भाजपनं आतापासून या निवडणुकीसाठी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर भाजपसोबत युतीत असलेली शिवसेना आता कर्नाटकमध्ये भाजपच्या विरोधात उतरणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी शिवसेनेकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी शिवसेनेच्या नेत्यांची चर्चा सूरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याच मुद्द्यावर प्रमोद मुतालिक हे रविवारी मुंबईच्या दौ-यावर आले असून त्यांनी शिवसेनेचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच ते उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. यावरुन मुतालिक हे शिवसेनेत प्रवेश करणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना श्रीराम सेनेच्या मदतीने कर्नाटकात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एंट्री मारणार असून बेळगाव, विजापूर, हुबळी, चिकमंगळूर या ठिकाणच्या १०० जागांवर निवडणूक लढवू शकते, याची तयारी मुतालिक यांनी केली आहे. स्वतः प्रमोद मुतालिक चिकमंगळूर मधून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना जर कर्नाटक विधानसभा लढली तर हिंदुत्ववादी मतदारावर प्रभाव असलेल्या मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
COMMENTS