शिवसेनेत आणखी एक मोठे बंड ?

शिवसेनेत आणखी एक मोठे बंड ?

मुंबई – शिवसेनेत यापूर्वी तीन मोठी बंड झाली. छगन भुजबळ काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. ते पहिले बंड. त्यानंतर नारायण राणे शिवसेनेतून काही आमदारांसह बाहेर पडले. ते दुसरे  बंड होते. तर राज ठाकरे हेही शिवसेनेतून बाहेर पडले. ते तिसरे मोठे बंड होते. अनेकांनी वेळोवेळी शिवसेना सोडली मात्र शिवसेनेत ही तीन मोठी बंड झाली. त्यातून शिवेसना सावरली आणि तिने पुन्हा उभारी घेतली.

आता आणखी एक मोठे बंड शिवसेनेत होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलं काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर केलेले शक्तीप्रदर्शन. तब्बल 20 ते 25 आमदारांना घेऊन शिंदे मातोश्रीवर दाखल झाले होते. आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते मातोश्रीवर गेले होते. शुभेच्छा देत असताना त्यातून त्यांनी पक्षनेतृत्वाला एक गर्भीत इशारा दिल्याचं बोललं जातंय.

सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिलं जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ते उपमुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरे की सुभाष देसाई यांना यावरुन खल सुरू आहे. शिवसेनेतल्या अऩेक बड्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे तसेच त्यांना 2019 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करावे अशी मागणी केली आहे. आदित्य यांना प्रोजेक्ट करण्यामागे सुभाष देसाई यांचे पक्षांतर्गत विरोधक असल्याची चर्चा आहे.

एकनाथ शिंदे हे सध्या पक्षाचे विधानसभेतील गटनेते आहेत. त्यांनाही उपमुख्यमंत्रीपद हवे असल्याची चर्चा आहे. आधीच मंत्रिमंडळात शिवसेनेच्या गोटातून विधान परिषदेतल्या नेत्यांना मंत्रीपदे दिली गेली आहेत. त्यामुळे विधानसभेतून निवडूण आलेले शिवेनेचे आमदार नाराज आहेत. तसंच उपमुख्यमंत्रीपद मिळावे अशी शिंदे यांची सुप्त इच्छा असल्याची चर्चा आहे. विधानसभेतील आमदारांची नाराजी आणि स्वतःची उपमुख्यमंत्री बनण्याची सुप्त इच्छा यातूनच शिंदे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केल्याचं बोलंल जातंय.

आता शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनाला कशाप्रकारे हाताळतात ते पहावं लागेल. शिंदे यांना याचा फटका बसणार की उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे येणार हे येत्या काही दिवसात दिसून येईल. उपमुख्यमंत्रीपद इतर नेत्यांकडे गेल्यास शिंदे नाराज होऊन काही विपरित निर्णय तर घेणार नाहीत ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

COMMENTS