मुंबई – शिवसेना एनडीएला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतील स्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेनेनं पुढचं पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. सामना संपादकीयातून उद्धव ठाकरे यांनी वर्तवलेली भूमिका.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही एका चांगल्या विचाराने बांधलेली मोट होती. ती टिकवावी व काँग्रेसला आजन्म पर्याय उभा करावा ही आमची भूमिका होतीच. अत्यंत संकट काळातही ‘रालोआ’ टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेनं शर्थ केली, पण आता भाजपने 380 ते 400 खासदारांचे ‘टार्गेट’ स्वबळावर ठेवल्यानं त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय आमच्या हाती दुसरे काय आहे ?शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला खांद्यावर घेऊन फिरवले व त्याच खांद्यावर बसून शिवसेनेच्या कानात घाण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. आता आंध्रच्या चंद्राबाबूंनी तोच अनुभव कथन केला. चंद्राबाबू हे तर पंतप्रधान मोदींचे प्रिय पात्रच होते. पण चंद्राबाबूंनीही ‘लव्ह जिहाद’ मोडून स्वाभिमानाचा जिहाद पुकारला आहे. 2019 च्या राजकारणास नवे वळण देणारे हे असे सुरुंग आहेत.
महाराष्ट्रातील ‘हवाबाज’ भाजप नेत्यांचे म्हणणे असे आहे, 2014 साली मोदी लाटेमुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. म्हणजे महाराष्ट्रात मोदी लाट की काय नव्हती तेव्हा शिवसेना कुठेच नव्हती व भाजपचीच चणे, कुरमु-यांची दुकाने सुरु होती. हे त्यांचे अज्ञान आहे व त्यांनी नव्यानं अभ्यास करून बोलायला हवे. मोदी लाट नव्हती तेव्हाही दिल्लीत शिवसेनेचे वाघ निवडून जातच होते. उलट महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता होती म्हणूनच भाजपास आजचे ‘अच्छे’ दिवस दिसत आहेत. 2014 च्या मोदी लाटेचे ठेवा बाजूला, आता 2019 चे घोडामैदान लांब नाही. तेव्हा शिवसेनेशिवाय किती खासदार तुमच्या बळावर निवडून येतात ते पाहू. म्हणजे शिवसेना काय व कोण आहे त्याचे विराट दर्शन या ‘लाट’करांना होईल. बिल्डर आणि ठेकेदारांच्या पैशातून सध्या जे राजकारण तरारले आहे ते टिकणारे नाही हे लक्षात घ्या.
COMMENTS