मुंबई – मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून पेडणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान खुला प्रवर्ग असल्याने महापौरपदासाठी सत्ताधारी शिवसेनेतील नगरसेवकांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. पक्षाचे सर्वात वजनदार नगरसेवक व ‘मातोश्री’शी थेट संबंध असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह किशोरी पेडणेकर, मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर या नगरसेवकांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. मात्र, यातून किशोरी पेडणेकर यांनी बाजी मारली आहे.
कोण आहेत किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा आहे.विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळीतील प्रचारात किशोरी पेडणेकर यांनी मोठे योगदान दिले होते.
COMMENTS