मुंबई – महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची कुरबुरी सुरु आहेत. अशातच आता शिवसेनेच्या मंत्र्यांनीही राष्ट्रवादीविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही आमच्या जिल्ह्यातील विकास कामे होत नाहीत. आवश्यक असलेले अधिकारी बदलून मिळत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री जिथे आहेत तिथे त्यांना हवे असलेले जिल्हाधिकारी आणि महत्वाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होते. काँग्रेस-NCP मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांसबंधी कामे गतीने होत नाहीत.उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात बसून त्यांच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांना आवश्यक असलेल्या कामांचा निपटारा करतात. त्यांच्या पालकमंत्र्यांना आवश्यक जिल्हाधिकारी- इतर अनेक अधिकारी झटपट बदलून मिळतात. मात्र आमच्याबाबतीत तसे होत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली असल्याची माहिती आहे.
दरम्यान काही मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता यांच्याविरोधातही नाराजी व्यक्त केली.मुख्य सचिवपदी असताना गेल्या 6 महिन्यात अजोय मेहता यांनी आम्हाला हवा असलेला एकही जिल्हाधिकारी-सनदी अधिकारी बदलून दिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
COMMENTS