मुंबई – शिवसेना आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असा ठराव शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मान्य केला आहे. तसंच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदच हवं या मागणीवरही सर्व आमदारांचं एकमत झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये असाच संघर्ष सुरु राहणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान या बैठकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सर्वोच्च आनंद असेल,असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. तर आम्ही मातोश्रीच्या आदेशाचे भुकेलेलो आहोत, असं म्हणत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सत्तास्थापनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. कोण सत्ता स्थापन करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेसाठी चाचपणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली.
या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुन प्रत्येक आमदारानयला शपथ दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
COMMENTS