कोल्हापूर – शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला असून त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेतील ज्येष्ठ आमदारांना दिलेली मंत्रीपदे काढून ग्रामिण भागातील आणि विधानसभेवर निवडणू आलेल्या मंत्र्यांना पदे द्या अशी मागणी त्यांनी केल्याचं कळतंय. असं नाही झालं तर नागपूरात होणा-या आगामी पावसाळी अधिवेशनावर बहिष्कार टाकण्याची धमकीच त्यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
शिवसेनेच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्र्यांपेकी एकटे एकनाथ शिंदे वगळले तर सर्वच कॅबिनेट मंत्री हे विधान परिषदेवरील आहेत. सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत आणि रामदास कदम हे चारही कॅबिनेट मंत्री विधान परिषदेतील आहेत. आमदारांचा राग सुभाष देसाई आणि डॉ. दीपक सावंत यांच्यावर असल्याचं कळतंय. मंत्रीपदाशिवाय मतदारसंघातील कामे होत नाहीत, महामंडळावर नियुक्त्या होत नाहीत. त्यामुळे अधिवेशनाला जायचेच कशाला असा सवाल त्यांनी केला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
याच मुद्यावरुन ग्रामिण भागातील विधानसभेतील तरुण आमदारांनी वारंवार पक्ष नेतृत्वासमोर आपली नाराजी व्यक्त कली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे. मात्र अजूनतरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता या नाराज आमदारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचं ठरवलं आहे अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवेसनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
COMMENTS