उस्मानाबाद – तब्बल साडेचार वर्षानंतर खासदार अवतरले, तेही पोस्टरच्या माध्यमातूनच…

उस्मानाबाद – तब्बल साडेचार वर्षानंतर खासदार अवतरले, तेही पोस्टरच्या माध्यमातूनच…

उस्मानाबाद – रवींद्र गायकवाड हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्त आहे. आमदार तसेच खासदार म्हणूनही त्यांनी काम केले. सध्याच्या लोकसभेत ते शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडूण आलेले आहेत. त्यांनी तब्बल दोन लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी बाजी मारली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डाँ. पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र निवडणुकीच्या नंतर त्यांनी मतदारसंघातील संपर्कच कमी केला आहे. क्वचीतच कधीतरी कार्यक्रमात हजेरी लावत असल्याने नागरिकांची त्यांच्या विषयी नाराजी वाढत आहे. खासदारकी पदरात पाडून घेतल्यानंतर ते अनेक दिवस मतदारसंघात फिरकलेच नाहीत.

लोकसभा निवडणुकीनंतर ते एकदा चर्चेत आले ते जिल्हा परिषद निवडणुकीत. त्यांच्या उमरगा विधानसभेतील दोन जिल्हा परिषद सदस्य फुटल्याने सत्ता गेल्याची चर्चा सेनेच्या गोटात होती. त्यालाही त्यांचाच अप्रत्यक्ष हात असल्याची चर्चा आहे. सेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला असता तर उपनेते तानाजी सावंत यांचं राजकीय वर्चस्व वाढले असतं. त्यामुळेच दोन सदस्य राष्ट्रवादीच्या गोटात जाण्यासाठी त्यांनी मदत केल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात होत आहे. त्यानंतर खासदार गायकवाड तिसऱ्यांदा चर्चेत आले ते विमानप्रवासावरून. विमानातील भांडणाने ते पुन्हा एकदा टीव्ही मिडीयात झळकले. विमान कंपनीने त्यांना प्रवासबंदी केली. त्यानंतर पुन्हा त्यांच्या बाजूने सहानुभूती वाटू लागली होती.

हे प्रकरण संपल्यानंतर खासदार प्रा. गायकवाड पुन्हा गायब झाले. त्यांचा थेट संपर्क तर सोडाच, त्यांचा मोबाईलही कधीच संपर्क क्षेत्रात नसल्याने कार्यकर्त्यांचाही रोष त्यांच्यावर वाढत आहे.  विशेष म्हणजे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही ते फारसे दिसून येत नाहीत. सेनेकडून त्यांना आमदारकी, खासदारकी तसेच जिल्हाप्रमुख अशा माध्यमातून भरभरून दिले आहे. मात्र खासदार झाल्यानंतर कोठेही पक्षविस्तारासाठी काम केल्याचे दिसून येत नाही, कोठे कार्यकर्ता मेळावा नाही ना कुठल्या राजकीय मेळाव्याला उपस्थित राहत नाहीत, असा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.
शिवाय खासदार फंडाच्या उद्घाटनाचे अनेक कार्यक्रम चिरंजीवांच्या उपस्थितीतच होत असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय जिल्हा नियोजनाची बैठक असो अथवा आढावा बैठक असो. अशा शासकीय कार्यक्रमातही त्यांची गैरहजेरी जाणवते. केंद्र शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यात राबविल्या जातात, त्या योजनावर दिशा कमिटीच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते. या कमिटीचे अध्यक्षही खासदारच असतात. मात्र या कमिटीच्या बैठकीलाही त्यांची वारंवार दांडी दिसून येते. येणाऱ्या निवडणुकीत पक्षातून स्थान मिळाले तरी जनता त्यांना त्यांच्या बाजूने उभी राहिल, असे चित्र सध्यातरी दिसून येत नाही.  दरम्यान लोकसभा निवडणुकीच्यानंतर गायब झालेले खासदार उस्मानाबाद शहरात पुन्हा अवतरले आहे. त्यांची ती हात उंच करून नमस्कार करण्याची छबी पोस्टरच्या माध्यमातून शहरातील चौका-चौकात झळकु लागली आहे.

COMMENTS