मुंबई – राज्यातील सत्तेत एकत्रित असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत फोडफोडी सुरु असल्याचं दिसत आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटून राष्ट्रवादीत गेले, याचा वचपा शिवसेनेने कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समितीच्या निवडणुकीत काढला आहे. कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.
दरम्यान कल्याणमध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3 असे पंचायत समिती सदस्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत ठरल्यानुसार सभापतीपद आणि उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्यात येणार होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेचे सभापती व उपसभापतीपदाचे उमेदवार रविवारी अर्ज मागे घेणार होते. मात्र मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेना नेत्यांची रविवारी सकाळी गुफ्तगू झाली आणि राष्ट्रवादीला दोन्ही पदे देण्याऐवजी भाजपने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेच्या अनिता दशरथ वाकचौरे यांनी सभापतीपदी बाजी मारली, तर शिवसेनेचे रमेश बांगर उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे नगरमधला वचपा कल्याण आणि अंबरनाथ तालुका पंचायत समितीत शिवसेनेने काढला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
COMMENTS