शिवसेनेला मोठा धक्का, “छावा” राष्ट्रवादीत, आज मुंबईत पक्षप्रवेश !

शिवसेनेला मोठा धक्का, “छावा” राष्ट्रवादीत, आज मुंबईत पक्षप्रवेश !

मुंबई – शिवसेनेला आज मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण संभाजी महाराज मालिकेतून घराघरात पोहचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे आज शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत हा पक्षप्रवेश होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडं शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. तसचं ते पक्षाचे उपनेते आणि प्रवक्ते म्हणूनही काम पहात होते.

डॉ. अमोल कोल्हे यांचा पक्षप्रमेश हा मुख्यत्वे त्यांना लोकसभेच्या उमेदवारीसाठी देण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यांना शिरुरमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शिरुरमधून तगडा उमेदवार नाही. विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्या नावाची चर्चा होती. लांडे यांनी तर प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र ते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरोधात कितपत तग धरतील याची शास्वसती पक्षाला नव्हती. दिलीप वळसे पाटील हे लोकसभा लढवायला तयार नव्हते. त्यामुळे पक्षाकडे आढळराव पाटील यांच्याशी टक्कर देईल असा तडगा उमेदवार नव्हता. त्यामुळेच डॉ. अमोल कोल्हे यांना गळाला लावण्यात आलं आहे.

संभाजी महाराजांच्या मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे डॉ. अमोल कोल्हे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्याचा राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकडवाड यांच्यासोबत त्यांनी पवार यांची भेट घेतली होती. कोल्हे यांच्या सोबत काही माजी आमदारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

COMMENTS