मुंबई – आगामी निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहूजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष एकत्र आला आहे. त्यामुळे शिवसेनेनं ‘सामना’ या मुखपत्रातून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले असून दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. तसेच दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. आता प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आलेत. हे दोघही पूर्वी पडद्यामागून भाजपाच्या सोयीचे राजकारण करत होते. आता ते २०१९ मधील निवडणुकीत उघडपणे भाजपाला मदत करतील अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
दरम्यान २०१९ च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नसल्याचंही शिवसेनेने म्हटले आहे.ओवेसी- प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी देशभरातील दलित संघटनांना एकत्र आणण्याची गरज असताना त्यांनी ओवेसीशी हातमिळवणी केली. हे दलित समाजाला रुचेल काय? असा सवालही शिवसेनेनं सामनातून केला आहे.
COMMENTS