मुंबई – राम मंदिर बांधण्यासाठी संसदेत कायदा करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेनं ही मागणी केली असून राम मंदिरासाठी साधू, संत व करसेवकांचे बलिदान गेले आहे. गुजरातमध्ये ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच. त्यामुळे संसदेच्या मैदानात राममंदिरावर चर्चा होऊ द्या. तिहेरी तलाक, ऍट्रॉसिटी अशा विषयांवर संसदेत चर्चा होते. घटना दुरुस्ती करून नवा कायदा केला जातो. मग प्रभू श्रीराम संसदेच्या पायरीवर बेवारस अवस्थेत का उभे आहेत? असा सवाल शिवसेनेनं सामनातून केला आहे.
दरम्यान अयोध्येतील रामाचा उद्धार सरकार कधी करणार? लांगुलचालनाच्या राजकारणाने राम मंदिराचा मार्ग खूप काळापासून रोखून धरला होता, असे श्री. मौर्य आता म्हणतात. पण हा मार्ग जनतेने खुला करून दिल्यावरही राममंदिर का होत नाही? प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला. देशाची ‘मन की बात’ आम्ही पुन्हा बोलून दाखवत आहोत. असंही सामानातून सेनेनं म्हटलं आहे.
दरम्यान भाजपच्या राज्यात राममंदिराचा फुटबॉल झाला आहे. ज्या रामाने सध्याचे ‘अच्छे दिन’ दाखवले त्यास फुटबॉलप्रमाणे इकडून तिकडे उडवले जात आहे. निवडणुका जसजशा जवळ येतात तसा हा फुटबॉलचा खेळ रंगत जातो. मंदिर निर्माणाचे सर्व पर्याय संपले तर संसदेच्या माध्यमातून मंदिर उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करू, असे केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले आहे. मौर्य हे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो संसदेचा अयोध्या मार्ग सांगितला आहे तो सर्व प्रकार रामभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचंही सामानातून म्हटलं आहे.
COMMENTS