मुंबई – नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजेंची शिवसेनेनं कानउघडणी केली आहे. शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत. शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा होता. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शाह व्यासपीठावर असताना शिट्ट्या मारणं, कॉलर उडवणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाही. याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. येथे हायकमांड आहे आणि ते दिल्लीत आहे अशी समज या अग्रलेखातून उदयनराजेंना देण्यात आली आहे.
दरम्यान उदयनराजे हे शिवरायांच्या सातारच्या गादीचे तेरावे वंशज असल्याने त्यांचा प्रवेश अमित शहा यांच्या दिल्लीतील बंगल्याच्या हिरवळीवर झाला आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला. भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. त्यामुळे राजांना शिस्तीचे वळण लागत आहे, त्यांचे अभिनंदन असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
संभाजी छत्रपती हे राज्यसभेत आहेत व भाजपने त्यांना नेमले आहे. भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले आणि आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले. साताऱ्याचे राजे युती परिवारात आले याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडंच. असं म्हणत उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाचे कोडकौतुक शिवसेनेनं केलं आहे.
COMMENTS