मुंबई – राज्यात महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. परंतु काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यातील बैठकीनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स वाढला आहे. कारण या बैठकीत शिवसेनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्तास्थापनेबाबत तुम्ही भाजप आणि शिवसेनेला विचारा, असं म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पवारांच्या वक्तव्यावरुन शिवसेनाही आता गोंधळात पडली असल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं प्लॅन बी तयार करण्याची मागणी शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. ‘शिवसेनेनं आता राष्ट्रवादीसोबत चर्चा करणं थांबवून पुन्हा भाजपसोबत चर्चा करावी,’ असा मतप्रवाह शिवसेनेत तयार होत असून याबाबतची शिवसेनेच्या एका आमदाराने पक्षाकडे मागणी केली असल्याची बातमी एका वृत्तपत्रानं छापली आहे. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार का?याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
COMMENTS