मुंबई – नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे. केंद्र सरकार व्यापारपासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’ ठरले असून महागाईचे ‘तेल’ आणि त्यात ‘राफेल’ असा सरकारचा मागच्या वर्षाचा प्रवास राहिला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सामनातून म्हटलं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांतील भाजपाची सरकारे जनतेने उखडून फेकली होती. २०१८ हे परिवर्तनाची नांदी नोंदवणारे वर्ष ठरले असून २०१९ हे संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था हा मावळत्या वर्षातील सर्वात तापदायक विषय ठरला असून देशात सर्वत्र मंदीच आहे. उद्योग-व्यवसाय, व्यापार, शेती, रोजगारनिर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रांना याचा फटका बसला असून मावळते वर्ष देशवासीयांसाठी उत्पन्नाच्या दृष्टीने गमावणारेच ठरले असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
राममंदिरावरुनही शिवसेनेनं भाजपर टीका केली आहे. शेकडो हिंदूंनी बलिदान दिले, पण हा सर्वोच्च विषय मात्र सरकारने गुंडाळून ठेवला, असा आरोपही शिवसेनेने केला आहे. साधू-संतही आता राममंदिर नाही तर २०१९ मध्ये मोदी पण नाही, असा शंखनाद करत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
COMMENTS