मुंबई – मुंबई विमानतळ परिसरात विविध मागण्यांसाठी शिवसेनेनं आज आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण करण्यात यावे. महाराजांचा पुतळा विमानतळाच्या दर्शनी भागावर असावा. या मागण्यांसाठी शिवसेना विधानपरिषद गटनेते ऍड अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच पुढील 20 दिवसात कार्यवाही सुरु केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.
दरम्यान या आंदोलनानंतर जीव्हीके व्यवस्थापनानं शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नामकरण करण्याची कार्यवाही सुरु झाली असून पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरणाचा आराखडा पुढच्या 15 दिवसांत तयार करण्यात येईल. अंतिम मंजुरीसाठी तो उद्धव ठाकरे यांना दाखवण्यात येईल. पर्यटकांना विशेषतः विदेशातील पर्यटकांना छत्रपतींच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी विमानतळावर व्यवस्था उभारण्यात येईल.
तसेच मुख्य मागणी होती की, छत्रपतींचा यापूर्वी दर्शनी भागात असलेला पुतळा विमानतळ नूतनीकरणावेळी अन्य जागी हलवण्यात आला होता. तो पुन्हा दर्शनी भागात बसवण्याची जागा नक्की करण्यात येईल. त्याबाबतची कार्यवाही व्यवस्थापणाकडून 20 दिवसांत दिसेल असं अश्वासनं जीव्हीकेनं शिवसेनेला दिलं आहे.
COMMENTS